89. स्वत: ला मुक्त करा

 

अनासक्ती आणि वीतराग असे काही शब्द गीतेचे मूळ शिकवण आहेत. आसक्ती आणि विरक्ती हे दोन ध्रुव आहेत, तर अनासक्ती म्हणजे या ध्रुवांच्या पलीकडे जाणे. त्याचप्रमाणे वीतराग हा राग किंवा विराग नसून दोन्हीच्या पलीकडे आहे. या ध्रुवीयता अहंकाराचे प्रतिबिंब असल्याशिवाय दुसरे काहीही नसतात आणि या अहंकाराचा त्याग करून व्यक्ती सर्व द्वैतांच्या पलीकडे जातात. ही अवस्था मुक्तीशिवाय दुसरे काही नाही.

या संदर्भात, श्रीकृष्ण म्हणतात, “जो मुक्त झाला आहे, सर्व आसक्तींपासून मुक्त आहे, ज्याचे चित्तनेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे, जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे आणि जो केवळ यज्ञ म्हणून कर्मे करतो, त्याची सगळीकर्मे नाहीशी होतात” (4.23). ‘मी’ मधून आपले आपल्या वस्तूंशी, मित्र आणि शत्रूंशी, आवडीनिवडीशी आणि विचार व भावनांशी नाते प्रस्थापित होते. त्यांचा त्याग केल्याने काही काळापुरती पोकळी निर्माण झाल्यासारखे वाटते ज्यातून वेदना, भीती, राग आणि खंत निर्माण होते. त्यामुळे, ‘मी’ चा त्याग करणे हे सोपे काम नाही. त्यामुळे, त्याग करायचा आहे तो मालकी हक्काचा, ळखीचा आणि कर्तेपणाच्या भावनेचा नाती, गोष्टी आणि लोकांचा नव्हे. हा सूक्ष्म फरक लक्षात आला की आपल्याला मुक्ती मिळते.

ज्याने ‘मी’ त्यागला आहे त्याची प्रत्येक निस्वार्थ कृती ही यज्ञच असते. यज्ञ हे कर्मकांड असून त्यात अग्नीला आहुती दिल्या जातात. येथे ते त्याग किंवा देण्या-घेण्याचे प्रतिक म्हणून वापरले आहे. आपण, अग्नीला आहुती देतो आणि ते त्या बदल्यात आपल्याला उष्णता देते जी जगण्याला साहाय्यभूत ठरते. आपली स्वयंपाक, पाणी द्रव स्वरुपात राखणे आणि शरीराचे तापमान योग्य राखणे याकरिता ही उष्णता उपयुक्त ठरते. मानवी शरीराच्या क्रिया या यज्ञासारख्याच आहे जेथे एक अवयव देतो, दुसरा घेतो आणि ते सगळे एकमेकांवर अवलंबून आहेत.

श्रीकृष्ण पुढे म्हणतात, या यज्ञात अर्पण अर्थात स्रुवा आदीही ब्रह्म आहे आणि हवन करण्याजोगे द्रव्यसुद्ध ब्रह्म आहे तसेच ब्रह्मरुप कर्त्याच्याद्वारे ब्रह्मरुप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे. त्या ब्रह्मकर्मात स्थिर असणार्‍या योग्याला मिळण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच आहे (4.24). अहंकार त्यागल्यानंतर प्राप्त होणारी ही एकत्वाची स्थिती आहे.


Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

69. अभिनेता आणि प्रेक्षकही