16. गुणातीत होणे
श्रीकृष्ण
म्हणतात की कोणत्याही कर्मासाठी कुणीही कर्ता नसतो. निसर्गाचा भाग असलेल्या सत्व, रज आणि तम गुण
यांच्यातील परस्परसंवादाचा परिणाम म्हणजे कर्म.
दु:खापासून
मुक्ती हवी असेल तर या तीन गुणांच्या पार जाणे आवश्यक आहे असा उपदेश श्रीकृष्ण
अर्जुनाला करत आहेत. गुणातीत कसे व्हायचे हे अर्जुनाला जाणून घ्यायचे आहे आणि
जेव्हा ही अवस्था प्राप्त होते तेव्हा तो मनुष्य नेमका कसा असतो हे ही त्याला
समजून घ्यायचे आहे.
गीतेत
नमूद केलेल्या द्वंद्वातीत (विरोधाभासांच्या पल्याड जाणे), दृष्टा (साक्षी) आणि समत्व या तीन
विषयांची आपण या अगोदरच चर्चा केली आहे. या तिघांच्या संयोगातून गुणातीत अवस्था
गाठता येते, असे श्रीकृष्ण
म्हणतात.
श्रीकृष्णाच्या
मते ज्या व्यक्तीने गुणातीत अवस्था गाठली आहे त्याला याची जाणिव असते कि गुणांचा
गुणांशी संबंध येत असतो आणि म्हणून तो साक्षीभावाने त्याकडे बघतो. एखाद्या विशिष्ट
गुणाची त्याला विशेष ओढही नसते आणि त्यापासून तो दूर ही जात नाही.
गुणातीत
हा एकाचवेळी द्वंद्वातीत ही असतो. सुख-दु:खाचे ध्रुव समजून तो दोन्हींप्रती तटस्थ
राहतो. स्तुती आणि टीकेच्या बाबतीत तो तटस्थ आहे कारण त्याला माहित आहे की हे तीन
गुणांचे उत्पादन आहेत. त्याचप्रमाणे तो मित्र आणि शत्रूंबद्दल तटस्थ असतो, हे समजून घेतो
की आपणच आपले मित्र आहोत आणि आपले शत्रू देखील आहोत.
भौतिक
जग हे दोन टोकांमध्ये विभागले गेले आहे आणि त्यांच्यातील तोल कुणा एका बाजूला
झुकणे हे नैसर्गिक आहे. दुसर्या बाजूने विचार केला तर असे लक्षात येते की सतत
झुलत असलेल्या लोलकालाही एक स्थिर बिंदू आवश्यक असतो. भगवान श्रीकृष्ण या स्थिर
बिंदूबद्दल सांगतात जेथे आपण पोहोचले पाहिजे आणि झुलण्याचा भाग न होता त्याकडे
म्हणजेच द्वंद्वाकडे साक्षीभावाने बघितले पाहिजे.
गुणातीत
व्यक्ती हा सोने, दगड आणि मूठभर माती यांना सारखेच महत्व देतो. या उदाहरणावरून हे
सांगायचे आहे की तो कोणत्याच एका गोष्टीला जास्त किंवा कमी महत्व देत नाही. वस्तू
जशा आहात तसेच त्यांचे मूल्यमापन तो करीत असतो, इतरांनुसार नाही.
श्रीकृष्ण
पुढे म्हणतात की गुणातीत म्हणजे कर्ता भाव सोडणारा. हे तेव्हा घडते जेव्हा आपण
आपल्या अनुभवातून समजतो की प्रत्येक गोष्ट स्वतःच घडते आणि कर्त्याचे त्यात फारसे
योगदान नसते.

Comments
Post a Comment