81. ‘मी’ समाविष्ट आहे

 

गीतेमध्ये अर्जुन आणि श्रीकृष्ण असे दोघेही ‘मी’चा वापर करतात मात्र दोघांच्या ‘मी’चे अर्थ आणि संदर्भ वेगळे आहेत. अर्जुनाचा मी हा त्याचे शरीर, संपत्ती, भावना आणि मान्यता तसेच त्याचे कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांशी निगडित आहे. आपली परिस्थितीदेखील अर्जुनापेक्षा वेगळी नाही. आपणही काही गोष्टी या आपल्याच आहेत आणि काही नाहीच असे समजतो. श्रीकृष्ण जेव्हा ‘मी’ चा उपयोग करतात तेव्हा ते सर्वसमावेशक असते. आपल्या इंद्रियांच्या मर्यादित क्षमतांमुळे आपल्याला भासणारे सर्व द्वंद्व आणि विरोधाभास तो सामावून घेतो. इतरत्र एका ठिकाणी श्रीकृष्ण जेव्हा असे म्हणतात की ‘मीच जन्म आहे आणि मीच मृत्यूही’ त्याचाही हा संदर्भ लक्षात घेतला पाहिजे.

श्रीकृष्ण हा सागर असला तरी आपण त्याच सागराचे थेंब आहोत. पण अहंकारामुळे आपण स्वतःला वेगळे समजतो. जेव्हा एक थेंब आपले अस्तित्व सोडून समुद्रात मिसळतो तेव्हा तो महासागर बनतो. श्रीकृष्ण हे सूचित करतात जेव्हा ते म्हणतात, "माझा जन्म आणि कृती दैवी म्हणजेच अलौकिक आहेत, अशा प्रकारे तत्वांपासून जाणणारा मनुष्य, तो देह सोडल्यानंतर पुनर्जन्म प्राप्त करत नाही,  पण फक्त मलाच प्राप्त करतो" (4.9). ही जाणिव होणे म्हणजे अहंकाराचा त्याग करणे आणि विरोधाभासांचा स्वीकार करणे आहे.

श्रीकृष्णाने वीतराग हा शब्दप्रयोग केला आहे ज्याचा रागही (गुंतणे) नाही आणि विरागही (तुटक वागणे) नाही असा आहे. ही अवस्था म्हणजे राग आणि विराग यांना समान पातळीवर बघण्याची अवस्था आहे. भय आणि क्रोधाच्या बाबतीतही असेच आहे (4.10).

श्रीकृष्णाने ज्ञान-तपस हा शब्द उच्चारला आहे. तपस म्हणजे इतर काही नसून जगण्याची शिस्तबद्ध पद्धत असा आहे आणि आपल्यापैकी अनेक जण तसे जगत असतात. अज्ञानातून केलेले तपस हे इंद्रियसुख आणि भौतिक सुखे मिळविण्यासाठी केलेली धावाधाव ठरते. श्रीकृष्ण आपल्याला ज्ञानतपसाचा मार्ग अवलंबिण्यास सांगतो. जागरुकतेने शिस्तबद्ध आयुष्य जगण्याचा हा मार्ग आहे.

श्रीकृष्ण म्हणतो की, "पूर्वीसुद्धा ज्यांचे आसक्ती, भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थिर राहात होते, असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळसे भक्त ज्ञानरूप तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत" (4.10).


Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही