106. सुखाचा लगाम
मध्य
आशियातून आलेल्या एका आक्रमकाने एकदा दिल्ली जिंकली आणि त्यानिमित्त त्याला
विजययात्रा काढायची इच्छा झाली. सजवलेल्या हत्तीवर तो बसला आणि त्याने हत्तीचा
लगाम मागितला. हत्तीचे नियंत्रण माहुताकडे आहे असे सांगितल्यावर त्याने लगेच
हत्तीवरून खाली उडी मारली आणि लगोलग आपला घोडा बोलविला. तो म्हणाला, तो कधीही अशा स्वार होत नाही ज्याचे नियंत्रण
दुसर्याच्या हातात आहे.
त्याचप्रमाणे
आपणही हा विचार करायला हवा की आपला सुख आणि भावना
यांचे नियंत्रण आपल्या हाती आहे की इतरांच्या हाती आहे. आपल्यापैकी सगळ्यांना
वाटते की लगाम आपल्या हाती आहे मात्र प्रत्यक्षात तो इतरांच्याच हाती असतो. एखादा
मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा कामाच्या ठिकाणचा सहकारी, एखादा पदार्थ, पेय किंवा
एखादी वस्तू, चांगली किंवा वाईट परिस्थिती, आपला भूतकाळ किंवा भविष्य यांपैकी
कशाचाही आपल्या भावनांवर परिणाम होऊ शकतो.
या
संदर्भात श्रीकृष्ण म्हणतात की, “जो साधक या मनुष्यशरीरात देहत्यागाआधी काम-क्रोधामुळे
उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच योगी होय व तोच सुखी होय” (5.23). इतरांकडून सुख
मिळवण्याची इच्छा ही वासना असते आणि आपल्याला राग तेव्हा येतो जेव्हा परिस्थिती
आपल्या इच्छेनुसार नसते.
श्रीकृष्ण
पुढे म्हणतात की "जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी, आत्म्यातच रमणारा आणि आत्म्यातच ज्ञान
मिळालेला असतो, तो परब्रह्म परमात्म्यासह ऐक्यभावला प्राप्त झालेला सांख्ययोगी शान्त
ब्रह्माला प्राप्त होतो (5.24). ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहे, ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे फिटले
आहेत, जे
प्राणीमात्राच्या कल्याणात तत्पर आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलपणे
परमात्म्यात स्थिर असते, ते ब्रह्मवेत्ते शान्त ब्रह्माला प्राप्र्त होतात" (5.25).
इतरांबद्दल सहानुभूती बाळगतानाच स्वत:बद्दल जागरूक असणे म्हणजे सेवा आहे. मोह आणि क्रोध या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास शिकलेला माणूस स्वत:ला आणि त्यामुळे इतरांनाही मदत करू शकतो. मात्र, त्यांचा गुलाम असलेल्या व्यक्तीला ते शक्य होत नाही.

Comments
Post a Comment