109. संन्यास म्हणजे कर्मफळाचे त्याग
आयुष्यात
अनेक चढ-उतार येतात आणि आपण ते कसे हाताळतो यावर बरेच काही अवलंबून असते.
परिस्थिती खडतर असते तेव्हा तणाव आणि नैराश्य येणे स्वाभाविक असते आणि अशावेळी आपण
कर्मांचा त्याग करण्याचा विचार करायला लागतो. कारण, आपण सगळे या भ्रमात असतो की
आपल्या आणि इतरांच्या कर्मामुळे आपल्याला सुख किंवा दु:ख मिळते. अर्जुनदेखील
द्विधा मनस्थितीत आहे आणि युद्ध लढण्याचे कर्म त्यागण्याची त्याची इच्छा आहे.
श्रीकृष्ण
स्पष्ट करतात, “जो पुरुष कर्मफलाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्मे करतो, तो संन्यासी व
योगी होय. आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी नव्हे; तसेच केवळ क्रियांचा त्याग करणारा
योगी नव्हे” (6.1).
कर्तव्य कर्म बद्दल अधिक वर्णन
केल्यास अधिक संभ्रम निर्माण होऊ शकतो कारण ती पूर्णपणे अनुभवण्याची बाब आहे.
पोहावे कसे हे शिकण्यासाठी आपल्याला पाण्यात उडी मारावी लागते आणि त्याचप्रमाणे, करायच्या
कृती समजून घेण्यासाठी आयुष्याला सामोरे जावे लागते. पोहोण्यासाठी तरंगणे जसे आहे
तसेच इंद्रियांचा आधार न घेता आनंदी राहणे हा आपल्या प्रगतीचा निकष आहे.
बीजाच्या
गर्भाचे रक्षण करण्यासाठी त्यावर आवरण असणे गरजेचे असते आणि योग्य वेळ आली की
अंकुराला मार्ग करून देणेही आवश्यक असते. हे आपल्याला अत्यंत नैसर्गिक वाटत असले
तरी बीजावरील आवरणाच्यादृष्टीने हे संभ्रमित करणारे आहे. कारण त्याला एकदा संरक्षण
करायचे आणि नंतर मुक्त वाट द्यायची आहे. या आवरणाप्रमाणेच आपल्याला शक्तिशाली
वर्तमानाने दिलेली सगळी कर्मे भूतकाळाचे ओझे न वागवता आणि भविष्यातील अपेक्षांचा
भार न घेता करणे हे आपले कर्तव्य कर्म आहे.
दुसरे,
श्रीकृष्ण म्हणतात की जो कर्मफलाचा त्याग करतो पण कर्मांचा नाही तो संन्यासी असतो.
यामुळे, ‘कर्म नाही म्हणजे पापही नाही, दु:खही नाही’ यासारख्या विचाराला तडा जातो.
कृष्णाच्या सांगण्यामुळे परिस्थितीपासून पळ काढण्याऐवजी आपल्यापैकी प्रत्येकाला
संन्यासी बनण्याची क्षमता प्राप्त होऊ शकते. ज्या क्षणी आपण कर्मफलांच्या
अपेक्षांचा त्याग करतो त्या क्षणी, परिस्थिती कशीही असो, आपण संन्यासी आनंदाची प्राप्ती होते.

Comments
Post a Comment