116. अध्यात्माचा सहज मार्ग
बहुतांश
लोक असे म्हणतात की आध्यात्मिक मार्गाचे अनुसरण करणे हे अत्यंत कठीण काम असते. अशा
लोकांनाश्रीकृष्ण आश्वासन देतात की कर्मयोगात अगदी लहानसे प्रयत्नही मोठे लाभ
मिळवून देतात (2.40). आणखी सोपे करून सांगताना ते म्हणतात, “जो योग्य प्रकारे खातो, आराम
करतो, काम करतो, झोपतो आणि जागा राहतो त्याला सर्व दु:खांचे नाश करणार्या योगाची
अनुभूती मिळेल” (6.17). भूक लागली असताना खाण्याइतकाच, कामाच्यावेळी काम करण्यासारखा,
झोपण्याच्या वेळेस झोपण्याइतका आणि थकल्यावर आराम करण्यासारखाच योग किंवा
आध्यात्मिक मार्ग सोपा आहे. यापेक्षा वेगळे काही सांगणे म्हणजे स्वत:ला किंवा
इतरांना काल्पनिक कथा सांगण्यासारखे आहे.
लहान
बालकाला म्हातार्या माणसापेक्षा झोपेची जास्त गरज असते. दिवसभरातील शारीरिक
हालचालींनुसार आपल्या शरीराला अन्नाची वेगवेगळी
गरज
भासते, हे दर्शवते की योग्य प्रमाणात म्हणजे वर्तमानात
जागृतीने जगणे आहे. यालाच आधी कर्तव्य कर्म (6.1) किंवा नियत कर्म (3.8) म्हटले आहे.
या
उलट, अगदी सोप्या गोष्टींमध्ये स्वत:च्या कल्पना मिसळून आपले मन त्यांना
गुंतागुंतीचे करून ठेवते. या आपणच आपल्याला सांगितलेल्या गोष्टींमुळे आपण
एखाद्याला नायक किंवा खलनायक ठरवतो आणि परिस्थितीला सुखद किंवा दु:खद ठरवतो. या
गोष्टी आपले शब्द आणि वर्तन निश्चित करतात. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात, पूर्णपणे
ताब्यात आणलेले चित्त जेव्हा परमात्म्यात पूर्णपणे स्थिर होते, तेव्हा भोगांची
इच्छा नाहीशी झालेला पुरुष योगयुक्त म्हटला जातो (6.18).
वारा
नसलेल्या जागी लावलेल्या दिव्याची ज्योत जशी स्थिर असते, तसेच स्वत:शी तादात्म्य
पावलेल्या योग्याचे नियंत्रित मन भरकटत नाही (6.19). श्रीकृष्ण एका ठिकाणी कासवाचे (2.58), नद्या आणि
सागराचे (2.70) उदाहरण देतो.
सागराला मिळणार्या नद्या आपले अस्तित्व मिटवून टाकतात आणि इतक्या नद्या मिसळूनही समुद्र शांत राहतो. त्याचप्रमाणे,
सागरासारखा स्थिर असलेल्या योग्याच्या मनात प्रवेश केलेल्या इच्छांचेही अस्तित्व
संपुष्टात येते.

Comments
Post a Comment