118. बदल हेच शाश्वत
भौतिक किंवा प्रकट जगात बदल ही एकमेव कायम बाब आहे आणि अप्रकट
किंवा आत्मा हा अपरिवर्तनीय असतो. त्यामुळे, दोन जगांमध्ये एकरूपता आणण्यासाठी
यंत्रणा असणे गरजेचे आहे. रूपक दृष्टया हे फिरणारे चाक आणि स्थिर हब यांच्या यंत्रणेतील
बॉल बेअरिंगसारखे किंवा इंजिन आणि चाकांच्या दोन वेगवेगळ्या गती हाताळणार्या
गिअरबॉक्ससारखे आहे. त्याचप्रमाणे, संवेदना, मन आणि बुद्धी यांची यंत्रणा ही
अपरिवर्तनीय आत्मा आणि सतत बदलणारे भौतिक जग यांच्यात कार्यरत असते. श्रीकृष्ण
म्हणतात की संवेदना या इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ असतात, मन हे संवेदनांपेक्षा
श्रेष्ठ असते आणि बुद्धी ही मनापेक्षा श्रेष्ठ असते. बुद्धीपेक्षाही स्व किंवा
आत्मा हा अधिक श्रेष्ठ आहे (3.42).
संवेदनांचे
भौतिक स्वरूप हे जगात होणार्या बदलांना आपोआप
प्रतिक्रिया देत असते. संवेदनांचे नियंत्रण करणारा भाग आणि स्मरणशक्ती यांच्या
संयोगातून मनाची रचना झाली आते आणि संवेदनांनी
अनुभवलेले सर्व बाह्य बदल हाताळून आपल्याला सुरक्षित ठेवण्याचे काम मनाने करावे अशी अपेक्षा असते. मात्र, संवेदनांच्या प्रेरणा
आपल्या मनाला नियंत्रित करतात की बुद्धी मनाला नियंत्रित करने हा खरा मुद्दा आहे. या प्रेरणांचा जास्त प्रभाव असेल तर आपले आयुष्य
प्रतिक्रियावादी बनेल आणि बुद्धीचा प्रभाव असेल तर आयुष्यात जागृती येईल.
म्हणूनच श्रीकृष्ण सांगतो की क्रमाक्रमाने
अभ्यास करीत उपरत व्हावे; तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून
दुसर्या कशाचाही विचार करू नये (6.25) आणि याचा दृढनिश्चय आणि उत्साहाने अभ्यास करण्यासही तो प्रोत्साहन देतो (6.23). समकालीन
साहित्यानेही हे सांगितले आहेच की कोणत्याही गोष्टीत कौशल्य प्राप्त करण्यासाठी
दहा हजार तासांचा सराव आवश्यक आहे.
या
प्रक्रियेत आपल्याला अगदी संकल्पाचाही त्याग करावा लागतो (उद्देश आणि नियोजन) आणि इंद्रियांचेही
नियंत्रण करावे लागते (6.24). इंद्रियांचे नियंत्रण म्हणजेच आपल्या आवडीच्या इंद्रिय प्रेरणांची
इच्छा नियंत्रित करणे होय. एकदा का आपण संवेदनांच्या पल्याड जाण्याचा सर्वोच्च
आनंद प्राप्त केला की मग कितीही मोठे दु:ख येवो त्याचा आपल्यावर परिणाम होऊ शकत
नाही असे आश्वासन श्रीकृष्ण देतात (6.22).

Comments
Post a Comment