119. जागरुकता आणि करुणा यांची सांगड

 

या पृथ्वीवर वावरलेल्या प्रत्येक महात्म्याच्या शिकवणीत आपल्याला समत्वाची महती गायलेली दिसते. प्रत्येकाचे शब्द, भाषा आणि पद्धत वेगळी असू शकते पण त्यांनी दिलेला संदेश समत्वाचाच आहे. या विरोधातील प्रत्येक उपदेश किंवा पद्धत हा केवळ दुराग्रह आहे.

मनाच्या संदर्भात, संवेदना आणि बुद्धी यांच्यातील संतुलन अत्यंत महत्वाचे असते. संवेदनांकडे अधिक झुकलो तर आपण इच्छा आणि वासनांच्या आहारी जाऊ. जर बुद्धीचे प्राबल्य अधिक असले तर आपण अधिक जागृत होऊ पण करुणेच्या अभावी आपण कदाचित इतरांना कमी लेखणे सुरू करू. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की, जो योगी आपल्याप्रमाणे सर्व प्राणिमात्रांना समभावाने पाहतो, तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दु:ख समदृष्टीने पाहतो, तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे (6.32). ही जागृती आणि करुणा यांची एकरूपता आहे.

दगड आणि सोने या दोन्ही गोष्टींना सारखेच महत्व देण्यास श्रीकृष्ण आपल्याला सांगतात. गाय, हत्ती आणि कुत्रा यांच्याही बाबतीत समत्व बघण्यास सांगतात. मित्र आणि शत्रू यांना समान पद्धतीने वागवावे असे तो सांगतो. थोड्या वेगळ्या उदाहरणाने हे समजून घेऊया. लोकांशी वागण्याच्या तीन विविध पातळ्या असतात. पहिली म्हणजे कायद्यासमोर सगळे समान असणे. म्हणजेच दोन भिन्न व्यक्तींना समानतेचा अधिकार असणे. दुसरे, दोन व्यक्ती किंवा गुणांपैकी एक आपल्याला अधिक प्रिय वाटते अशा स्थितीत दोघांनाही समान वागणूक देणे. म्हणजेच आई-वडील आणि सासू-सासरे यांच्याशी समान पद्धतीने वागणे. तिसरी पातळी म्हणजे आपल्याला आणि इतरांना समपातळीवर बघणे. त्यांची दु:खे आपली आणि आपले आनंद त्यांचे आहेत अशा प्रकारे वागणे. ही समत्वातून जन्मास येणारी शुद्ध करुणा आहे. “कारण ज्याचे मन पूर्ण शांत आहे, जो पापरहित आहे आणि ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे, अशा या ब्रह्माशी ऐक्य पावलेल्या योग्याला उत्तम आनंद मिळतो”, असे श्रीकृष्ण म्हणतात (6.27).

हे साध्य करण्यासाठी श्रीकृष्ण दृढ निश्चयाने नियमित सराव करण्याची सल्ला देतात (6.23). अस्थिर आणि बेचैन मन जरी भरकटले तरी आपल्याला त्याला नियंत्रणात आणावे लागेल आणि परमात्म्यात स्थिर करावे लागेल (6.26). नियमित सरावाने अमर्याद आनंद मिळण्याची खात्री तो देतो (6.28).


Comments

Popular posts from this blog

88. पापाचे पैलू

90. त्यागाचा त्याग

67. संबद्ध आणि असंबद्ध